तामिळनाडूतील महिला कर्मचाऱ्यांना आता तिसऱ्या अपत्यासाठीही मिळणार एक वर्षाची प्रसूती रजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडू सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मावेळीही ३६५ दिवस प्रसूती रजा मिळणार आहे. आधी ही रजा केवळ 12 आठवड्यांची होती, ती वाढवून आता पहिल्या दोन अपत्यांप्रमाणेच पूर्ण एका वर्षाची करण्यात आली आहे.

मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री डी. सरथकुमार यांनी विधानसभेत अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केली. ते म्हणाले, “तामिळनाडू सरकार हे सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे कल्याणकारी सरकार आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्यासाठी मिळणारी 12 आठवड्यांची प्रसूती रजा आता वाढवून 365 दिवस करण्यात येत आहे.”

तामिळनाडूमध्ये पूर्वी प्रसूती रजा 90 दिवसांची होती. 2011 मध्ये रजा वाढवून 6 महिने करण्यात आली. 2016 ही मुदत 9 महिने करण्यात आली. द्रमुक सरकारने ती वाढवून एका वर्षाची (365 दिवस) केली होती. सध्याच्या नियमांनुसार, दोनपेक्षा कमी मुले असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 365 दिवसांची प्रसूती रजा दिली जाते, तर दोन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 12 आठवडे (84 दिवस) सवेतन रजा मिळत होती.

आता शासनाच्या या नव्या घोषणेमुळे तिसऱ्या अपत्यासाठीही पूर्ण 1 वर्षाची रजा उपलब्ध होणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच सविस्तर शासन आदेश (Government Order) जारी केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.