
कोरे विमानतळ तसेच परिसरातील सहा गावांमध्ये येऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला पालघरवासीयांचा ठाम विरोध होत आहे. आमचा विकासाला विरोध नाही मात्र भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करू नका. या प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी, शेती, घरे, मच्छीमारी, दुग्धव्यवसाय, भाजीपाला उत्पादन आणि इतर पारंपरिक व्यवसाय नष्ट होणार आहेत.
त्यामुळे या प्रकल्पांना विरोध होत असून पाल घर तालुक्यातील एडवण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शिवसेना ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे आहे, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
प्रस्तावित कोरे विमानतळ आणि एमआयडीसी प्रकल्पामुळे उसरणी, दांडा-खाडी, खटाळी, मधुकरनगर, माथाने, भादवे तसेच परिसरातील इतर गावांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात गावांच्या अस्तित्वासमोर निर्माण होणारे प्रश्न याकडेही प्रशासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनुप पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी राकेश पाटील, गौरव गावड, प्रभाकर ठाकूर, तालुकाप्रमुख नचिकेत पाटील, आशिष पुरंदरे, उपतालुकाप्रमुख आशिष पाटील, नीलेश पाटील, छाया पाटील, प्रदीप वर्तक, भूपेश वैद्य, बिपिन बारी, मंगेश आकरे, धनु राऊत, मोरेश्वर किनी, प्रदीप पाटील, भूषण वैद्य, दिलीप पाटील, भूपेश म्हात्रे, हेमंत ठाकूर, अविनाश किनी आदी उपस्थित होते.


























































