
हिंदुस्थानामध्ये काहींना क्रिकेट हा धर्म वाटतो, तर क्रिकेटपटूंना देवासमान वागणूक दिली जाते. पण मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये मात्र एकाही क्रिकेटपटूला पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही.
माजी फुटबॉलपटू इसैह अरुमैनयागम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. याशिवाय अॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंग, बॉक्सिंग प्रशिक्षक छोटे लाल यादव यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोडला सर्वोत्तम राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वतः अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. या वर्षी या पुरस्कारांसाठी मोठय़ा संख्येने अर्ज प्राप्त झाले होते, ज्यांचा विचार निवृत्त न्यायमूर्ती मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केला. या समितीत नामवंत क्रीडापटू, क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेले व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा समावेश होता.
पुण्याच्या ‘आर्मी पॅरालिम्पिक नोड’ला पुरस्कार
पेंद्रीय क्रीडा पुरस्करांमध्ये ‘राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारा’साठी पुण्याच्या ’आर्मी पॅरालिम्पिक नोड’ची निवड करण्यात आली. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देऊन त्यांना जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पोहोचवण्याचे काम ही संस्था करते. कर्तव्य बजावताना दिव्यांगत्व आलेल्या सैनिकांना ही संस्था प्रशिक्षण देते. आतापर्यंत बऱ्याच दिव्यांग खेळाडूंना या संस्थेने जागतिक पॅरा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी पाठवले आहे आणि काही जणांनी घवघवीत यशही मिळवलेले आहे. त्यामुळे या संस्थेने आतापर्यंत केलेल्या अविस्मरणीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे
तेजस्विन शंकर, मुहम्मद अजमल व प्रियंका गोस्वामी (अॅथलेटिक्स), त्रिशा जॉली व पुलेला गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), नरेंद्र (बॉक्सिंग), विदित गुजराती व दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुश श्रीकांत (डिफ शूटिंग), लालरेम्सियामी व राजपुमार पाल (हॉकी), सुरजीत व पूजा (कबड्डी), ऋद्रांश खंडेलवाल (पॅरा शूटिंग), एकता भायन (पॅरा अॅथलेटिक्स), अरविंद सिंह (नौकानयन), अखिल शेओरन (नेमबाज).

























































