
बोरिवलीपासून विरार लोकलमधील घुसमटवणारी गर्दी, मारामारी, वादावादी यातून पश्चिम उपनगरवासीयांना दिलासा मिळणार आहे, कारण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो 13 मीरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानच्या मेट्रो 13 प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या मार्गावर एकूण 16 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यामध्ये 13 उन्नत आणि तीन भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पात मेट्रो मार्गासह 4.92 किलोमीटर लांबीच्या वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडणारा सहा पदरी रस्ता आणि मेट्रो असलेल्या एकत्रित पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे.
मेट्रो 13 मार्ग नायगाव, नालासोपारा आणि विरार उपनगरी रेल्वे स्थानकाशी जोडणार जाणार असून मेट्रो मार्ग क्रमांक 9 सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर बस सेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मान्यतेनंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
17 हजार 724 कोटींचा खर्च
मेट्रो 13 -मीरा भाईंदर ते वसई-विरार मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर एकूण 17 हजार 725 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची एकूण लांबी 25.03 किलोमीटर असून, त्यापैकी 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत तर 3.25 किलोमीटर मार्ग भूमिगत असेल. पुढील पाच वर्षांत म्हणजे 2031 मध्ये या मार्गावर दररोज सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
























































