पहिला गेम गमावल्यानंतरही सेनने गाठले विजयी लक्ष्य, महिला एकेरीत उन्नती हुडाचाही जोरदार विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्य सेन खचला नाही. त्याने जोरदार पुनरागमन करत असा झंझावात उभा केला की ऑस्ट्रियाचा कॉलिन्स व्हॅलेंटाईन फिलिमॉन त्यात अक्षरशः वाहून गेला. बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 14व्या मानांकित लक्ष्यने जागतिक क्रमवारीत 128व्या स्थानावरील फिलिमॉनचा 16-21, 21-8, 21-4 असा धुव्वा उडवत दुसऱ्या फेरीत दणक्यात प्रवेश केला.

पहिल्या गेममध्ये 10-10 अशी चुरस असताना फिलिमॉनने सलग गुण घेत 19-12 अशी आघाडी मिळवली आणि गेम खिशात घातला. मात्र दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने सामन्याचे चित्रच पालटले. 10-8 अशी आघाडी घेतल्यानंतर त्याने सलग 11 गुणांचा पाऊस पाडत गेम 21-8 असा जिंकला. तसेच महिला एकेरीत उन्नती हुडाने म्यानमारच्या थेत हतर थुझारचा 22-20, 21-16 असा पराभव केला. आता तिच्यासमोर पॅनडाच्या माजी राष्ट्रपुल विजेत्या मिशेल लीचे तगडे आव्हान असेल.

पुरुष एकेरीत हिंदुस्थानचे आशास्थान असलेल्या लक्ष्यने पहिला गेम गमावला. हा त्याच्यासाठी धक्का होता, पण मग त्याने निर्णायक गेममध्ये  प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः शरणागती पत्करायला लावली. 14-1 अशी आघाडी घेत त्याने सामना पूर्णपणे आपल्या मुठीत घेतला आणि 45 मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब केले. 2021च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य आता उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या 92व्या क्रमांकावरील गॅरेट टॅनशी भिडणार आहे.

त्याचप्रमाणे महिला दुहेरीत त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम-ऑलिसन ली जोडीचा 21-15, 21-12 असा पराभव करत अंतिम 16 मध्ये स्थान मिळवले.

महिला एकेरीत उन्नती हुडाने म्यानमारच्या थुझारचा कडव्या लढतीत 22-20, 21-16 असा पराभव केला. या लढतीत दोघांनाही संधी होती, पण उन्नतीने प्रगती केली. मात्र मिश्र दुहेरीत रोहन कपूर-रुथविका गड्डे, तसेच आशिथ सूर्या-अमृथा प्रमुथेश यांना पराभवाचा सामना करावा लागला.