
आशियाई ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या रॅपिड प्रकारात कझाकस्तानचा अखिलबाय इमांगाली आणि हिंदुस्थानचा माधवेंद्र प्रताप शर्मा यांनी 4 फेऱ्यांत 4 गुण मिळवत 82 खेळाडूंच्या स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. अजून स्पर्धेच्या तीन फेऱ्या शिल्लक असून हिंदुस्थानसमोर हिंदुस्थानच्या खेळाडूंचेच आव्हान उभे ठाकले आहे. या स्पर्धेत 3.5 गुणांसह चार तर 3 गुणांसह बारा खेळाडू जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. अंधेरीत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंचाच दबदबा दिसतोय. मुलांच्या गटात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये हिंदुस्थानचेच नऊ खेळाडू आहेत. मुलींच्या रॅपिड गटातही जोरदार चुरस पाहायला मिळत असून चौथ्या फेरीअखेर सहा खेळाडू 4 फेऱ्यांत 3.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
























































