
“वाचाल तर वाचाल”. हो वाचन तुम्हाला आनंद आणि नवनवीन माहिती देऊन चिरतरुण ठेवत असते. वाचनासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी वयाचं बंधन नसते. वयवर्षे ९५ असलेले एक गृहस्थ दर आठवड्याला रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयात येऊन वाचनासाठी एक पुस्तक घेऊन जातात. पाय थकले तरी वाचनाची भूक मात्र तशीच आहे. ही गोष्ट आज तरूणांना “वाचाल तर वाचाल” हेच सांगणारी आहे.
आजकाल वाचनाची आवड कमी झालीय, अशी ओरड ऐकू येते. काही मंडळी म्हणतात वाचनालयात जाऊन वाचनाची आवड कमी झाली असून सोशल मिडिया आणि इंटरनेटवर वाचन वाढलं आहे. अशा अनेक चर्चा सुरू असताना तरूणांना विचार करायला लावणारी एक गोष्ट रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयात पहायला मिळाली आहे. वयवर्ष ९५ असलेले गजानन मुळ्ये हे न चुकता दर आठवड्याला रत्नागिरी नगरवाचनालयात येतात आणि एक पुस्तक वाचनासाठी घेऊन जातात. गजानन मुळ्ये रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रत्नागिरी शहरानजीक नाचणे येथे रहातात. यावयातही ते पुस्तकांच्या ओढीने जयस्तंभ येथील रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात येतात. स्वतः एका स्टूलावर बसतात आणि कपाटातील पुस्तकं चाळून एक पुस्तक वाचनासाठी निवडतात. काम करून माणूस थकतो पण वाचन करून तो विचाराने तरूण रहातो हा संदेश गजानन मुळ्ये आपल्या वाचनाच्या आवडीतून देतात.
दोन वर्षात १७८ पुस्तकं वाचली
आजही अनेक नवीन पुस्तके प्रकाशित होत असतात. नव्या पुस्तकांतून नव्या युगाची माहिती आणि जाणीव वाचकांन होत असते. लहान मुले चित्रातून वाचतात पण एकदा अक्षरांची ओळख झाली की शब्द आपल्या ज्ञानाचे भांडार उघडून देतात पण त्यासाठी वाचनाची आवड गरजेची आहे. गजानन मुळ्ये या वयातही दर आठवड्याला एक पुस्तक घरी नेऊन वाचत आहेत हे ग्रंथालय चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन मुळ्ये यांनी १६ जुलै २०२४ असून आजपर्यंत १७८ पुस्तक वाचली आहेत. म्हणजे त्यांच्या वाचनाचा वर्षाचा स्कोर ८९ पुस्तकं आहे.






























































