विद्यार्थ्याचे अपहरण करून गोदामात बेदम मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह १२ जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका विद्यार्थ्याच्या अपहरणात आणि बेदम मारहाणीत झाल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थी अथर्व देशमुख याला १० ते १२ जणांच्या टोळक्याने रस्त्यावरून उचलून नेत एका गोदामात डांबून लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुरुवारी रात्री अथर्व देशमुख हा आपल्या मित्रांसह कल्याण पश्चिममध्ये गेला असताना गाडी बाजूला घेण्यावरून काही तरुणांशी त्याचा वाद झाला. त्यानंतर हरवलेले पाकीट शोधण्यासाठी अथर्व आणि त्याचे मित्र पुन्हा त्या परिसरात गेले. यावेळी १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांना घेरले. या टोळक्याने अथर्व, दानिश शेखसह त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लाठी, बांबू तसेच लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. त्यानंतर अथर्वला जबरदस्तीने उचलून नेत एका गोदामात डांबण्यात आले. तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

मारहाणीत अथर्वच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथर्वचे वडील सागर देशमुख यांच्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी दिली.