पुण्यात खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, ठेकेदार-अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची रोहित पवार यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील ग्रीन कोट सोसायटीसमोर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. या घटनेवरून त्यांनी रस्त्यांच्या कामातील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला. राज्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांसाठी रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार सर्वस्वी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“दोन-दोन हातांनी कमिशन खाल्ल्यामुळे रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आणि आता पावसामुळे त्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.

रस्त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर निश्चित केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील या रस्त्याच्या प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणा रोहित पवार यांनी केली आहे.

अशा प्रकारची कठोर कारवाई झाली तरच भविष्यात रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखला जाईल आणि निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याच्या घटना रोखता येतील, असेही त्यांनी म्हटले.