
राज्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जवळपास प्रत्येक शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव जात असून नाशिकनंतर आता पुण्यामध्येही खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना प्राण गमवावा लागल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंजे परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका 11 वर्षीय चिमुरड्याचा वडिलांच्या डोळ्यांदेखत रस्ते अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरील दुचाकी घरसल्याने हा भीषण अपघात झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुलगा आपल्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत दुचाकीवरून खासगी शिकवणीसाठी जात होता. बालेवाडी-म्हाळुंगे रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीचे संतुलन बिघडल्याने 11 वर्षांचा मुलगा रस्त्यावर पडला. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकच्या चाकाखाली तो आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यात खड्ड्याने घेतला 11 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव; वडिलांच्या डोळ्यादेखत ट्रकखाली गेला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/nFHwj2BoT3
— Saamana Online (@SaamanaOnline) August 18, 2026
दरम्यान, हा भीषण अपघात परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघातानंतर वडिलांनी थरथरत्या हाताने मुलाला उचलले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या भीषण अपघातामुळे रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
परिसरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि जीवघेणे खड्डे यांबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


































































