किन्हवली तालुका झालाच पाहिजे, हजारो ग्रामस्थांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

६० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किन्हवली तालुका निर्मिती प्रक्रियेला गती मिळावी व फेब्रुवारी २०२७ नंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध होताच शहापूर तालुक्याचे विभाजन करून नवा किन्हवली तालुका निर्माण करण्यात यावा या मागणीसाठी रविवारी किन्हवलीत नागरिकांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, संस्था, संघटना यांच्यासह हजारो नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहत किन्हवली तालुका झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार करण्यात आला.

किन्हवली तालुका निर्मितीला गती मिळावी यासाठी किन्हवली परिसरातील ९३ गावांच्या नागरिकांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यदिनी किन्हवली तालुका निर्मिती समन्वय समितीच्या माध्यमातून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंग सर्वपक्षीय नेत्यांसह हजारो नागरिकांनी या मेळाव्याला हजेरी लावत तालुका निर्मितीसाठी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. अनेक ग्रामपंचायतींनी, सामाजिक संघटनांनी पाठिंबा पत्र दिले. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार शामकांत पतंगराव, सचिवपदी संतोष दबणे यांच्यासह २१ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.

  • १९६६ पासून स्वतंत्र तालुक्यासाठी किन्हवलीकरांचा पाठपुरावा सुरू.
  •  १९७८ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री उत्तमराव पाटील यांचे सकारात्मक आश्वासन.
  •  २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.
  •  २०१९ साली ठाणे जिल्हा परिषदेने किन्हवली तालुका निर्मितीचा ठराव करून शासनाला पाठवला.
  • तहसीलदार भुताळे यांच्या कार्यकाळात शासनाला अहवाल दिला. मात्र आजतागायत स्वतंत्र किन्हवली तालुका झालेला नाही.