महाराष्ट्रातील रस्ते खराब, गुजरातचे चांगले; नंदुरबार येथील रस्त्यांच्या अवस्थेमुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते! हसन मुश्रीफ यांचा ‘घरचा आहेर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गुजरातमधील रस्ते चांगले; पण महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत,’ असा महायुती सरकारला ‘घरचा आहेर’ देतानाच नंदुरबार येथील रस्त्यांची अवस्था पाहता पालकमंत्री म्हणून आपल्याला लाज वाटत असल्याचे वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. महिन्यातून एक-दोन वेळा नंदुरबारला जात असतो. 1 सुरतवरून नंदुरबारला तीन तासांचा रस्ता आहे. त्यापैकी दोन तासाच्या प्रवासातील गुजरातमधील रस्ते चांगले आहेत, तर एक तास नंदुरबार जिल्ह्याचा रस्ता असून, तो अतिशय खराब असल्याने हे वक्तव्य केले आहे. मी त्या दिवशीही सांगितले की, आपल्याला आता दर्जेदार रस्ते करायला पाहिजेत. नंदुरबारमधील रस्त्यांची जी अवस्था आहे, ती पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते.

रस्त्यांच्या मुद्द्यावर विरोधक आंदोलन करणार, ते त्यांचे कामच आहे; पण सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीदेखील आता राज्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या पद्धतीने पावसाळ्यानंतर रस्ते खराब होतात, ते खराब होऊ नयेत, यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे, असे माझे म्हणणे होते. सरकार कोणतेही आले तरी पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरून खड्डे पडणार नाहीत, असे रस्ते तयार केले पाहिजेत,’ अशी सारवासारव मंत्री मुश्रीफ यांनी केली.

रेल्वेमंत्री होण्याची इच्छा

आगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार असल्याची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करताना, पुढची लोकसभा निवडणूक जनतेने आशीर्वाद दिला तर लढणार आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री होण्याची माझी इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.