जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेनंतर CRPF चे वाहन उलटले, 5 जवानांसह 7 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड परिसरामध्ये मंगळवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. ट्रक (क्र. JK02DU-4386) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) मिनी-ट्रकमध्ये (क्र. JK02CG-5795) झालेल्या समोरासमोर धडकेत सीआरपीएफच्या पाच जवानांसह एकूण 7 जण जखमी झाले आहेत. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

ट्रक आणि सीआरपीएफच्या वाहनामध्ये झालेला हा अपघात लेव्हडोरा भागात घडला. सीआरपीएफच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सीआरपीएफच्या 4 अधिकाऱ्यांसह 5 जवान आणि ट्रकचा चालक व वाहक जखमी झाले आहेत.

इन्स्पेक्टर राज कुमार तिवारी, एसआय/जीडी राजेंद्र सिंह, एएसआय/जीडी लवेंडे, एएसआय/जीडी उमेश कुमार, हेड कॉन्स्टेबल ड्रायव्हर वीरेंद्र अशी जखमी जवानांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीमुळे आणि कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.