मुंबई डेंग्यू, मलेरियाच्या विळख्यात, तीन महिन्यांत मलेरिया – 3,177, डेंग्यू – 1069 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पावसाळी आजारांनी चांगलेच घेरले असून गेल्या तीन महिन्यांत मलेरियाचे 3177, डेंग्यूचे 1069 तर लेप्टोचे 189 रुग्ण आढळले आहेत. या तीन महिन्यांत पालिकेने 5 लाख 63 हजार 382 लोकांचे सर्वेक्षण केले असून 32 हजार 158 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.

पालिकेच्या अहवालानुसार ई-विभागातील भायखळा, मदनपुरा, माझगाव; के-पश्चिममधील अंधेरी, नेहरू नगर, आंबोली; जी-दक्षिणमधील बीडीडी चाळ, सस्मिरा; एफ-दक्षिणमधील परळ, भोईवाडा, शिवडी आणि एच-पश्चिममधील हिल रोड, टर्नर रोड, पेरी क्रॉस रोड या परिसरांत मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पावसाळ्यात गतवर्षी याच कालावधीत मलेरियाचे 2,852 रुग्ण होते. यंदा ही संख्या 3,177 वर पोहोचली आहे. म्हणजेच वर्षभरात मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. दुसरीकडे लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण गतवर्षी 322 होते, तर यंदा 189 आहेत. एफ-उत्तर, एम-पूर्व, टी, के-पूर्व आणि जी-उत्तर विभागातील विविध परिसरांत लेप्टोस्पायरोसीसच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

11227 ठिकाणी आढळला एडीस डास

या वर्षी डेंग्यूच्या रुग्ण संख्येत गतवर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. जून-जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत गतवर्षी 1,217 रुग्ण होते, तर यंदा 1,079 रुग्ण नोंदले गेले. मात्र डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. पालिकेने तब्बल 4 लाख 74 हजार 341 उत्पत्तीस्थाने तपासली. त्यापैकी 11,227 ठिकाणी एडीस डासांची उत्पत्ती आढळली. याशिवाय छपरांवरून आणि आवारातून 674 टायर आणि 25,860 भंगार वस्तू हटविण्यात आल्या आहेत.

3319 ठिकाणी आढळला अॅनोफिलीस डास

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मलेरिया नियंत्रण पथकाने विहिरी, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव आदी 17,793 उत्पत्तीस्थाने तपासली. त्यापैकी 3,319 ठिकाणी अॅनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आली. त्याचबरोबर 18,568 इमारतींच्या परिसरात आणि तब्बल 3 लाख 18 हजार 803 झोपडय़ांमध्ये पालिकेने धूम्रफवारणी केली आहे.