शनिदेवाला पुन्हा भेसळयुक्त तेलाचा अभिषेक; शुद्ध तेल वापराच्या निर्णयाला व्यावसायिकांकडून हरताळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शनिमहाराजांना शुद्ध रिफायनरी खाद्योपयोगी ब्रँडेड तेलाचा अभिषेक करावा, यासाठी तत्कालीन विश्वस्त मंडळाने दि. १ मार्च २०२५ रोजी कडक निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. त्यामुळे पाऊच, सुट्या व भेसळयुक्त बनावट तेलामुळे होणारी शनिमूर्तीची झीज टळली गेली. दरम्यान, या निर्णयाला आता व्यावसायिकांनी हरताळ फासला असून, शनिमूर्तीला पुन्हा भेसळयुक्त तेलाचा अभिषेक होत आहे. खराब तेल भाविकांच्या माथी मारून श्रद्धेवरच घाला घालण्याचा प्रकार सुरू आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी व संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

श्री शनैश्वर देवस्थान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ साली झालेल्या ग्रामसभेत शनिमूर्तीला फक्त ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करण्याचा ठराव मंजूर करून त्याची अंमलबजावणी एक मार्च २०२५ पासून करण्याचे ठरवले. या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पाश्र्वभूमीवर त्यावेळी शनिदेवस्थानकडून खासगी व्यावसायिकांना नोटिसा बाजविण्यात आल्या. भेसळयुक्त तेलावर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याने भाविकांनीही या निर्णयाला जोरदार प्रतिसाद दिला होता. मूर्तीवर रिफायनरी खाद्योपयोगी तेलाचाच अभिषेक सुरू होता. मात्र, शासनाने हे मंदिर ताब्यात घेतल्याने येथे अकरा महिन्यांपासून सध्या प्रशासकाची नेमणूक आहे. येथे प्रशासन कामकाजाला शिस्त आणली गेली. मात्र, शनिमूर्तीला वाहण्यात येणाऱ्या व अर्पण करण्यात येणाऱ्या तेलामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले. या तेलामुळे मूर्तीची झीज होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

येथील श्रीराम सेना व काही व्यावसायिकांनी तेलात भेसळ असल्याचा संशय व्यक्त करून देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांना निवेदन दिले. शनिभक्तांची पूजा साहित्यामध्येही लूट होत असल्याच्या कारणाने शनिमंदिर प्रशासक, नाशिक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पूजा साहित्यविक्रीचे दंडक ठरवून देऊन सर्वत्र वाहनतळावर दरफलक झळकावले. पूजेचे दर १५१ रुपये ते ५५१ रुपये ठरवण्यात आले. शुद्ध रिफायनरी खाद्योपयोगी तेलाचे दर २०० मिली, शंभर रुपये, ५०० मिली दोनशे रुपये, एक लिटर तीनशे रुपये, पाच लिटर पाचशे रुपये, १५ लिटर चार हजार पाचशे रुपये निश्चित करण्यात आले. वाढीव दर देऊनही काही व्यावसायिकांकडून भेसळयुक्त तेलाची विक्री होत आहे.

तीळतेलाचा अभिषेक

शनिशिंगणापुरात शनिमहाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून तसेच देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतात. शनिमहाराजांना प्रिय असलेल्या शुद्ध तीळतेलाच्या अभिषेकालाच महत्त्व आहे. शनीची साडेसाती दूर करण्यासाठी शनिदेवांना तेल अर्पण करून त्यांना शांत करण्याने आत्मिक समाधान मिळते, असे मानले जात असल्याने भाविकांकडून शनिदेवांना तेल अर्पण केले जाते.

शनिमंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आवाहन देवस्थानने अन्न व औषध प्रशासन विभागाला केले आहे.

अतुल चोरमारे, कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान.