
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जाडेजाने आपले ३५० कसोटी बळी पूर्ण करून जागतिक क्रिकेटच्या इतिहासातही आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले. जाडेजाच्या या कामगिरीने या काळातील सर्वात प्रभावी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्याचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
केसरा नुवांथा ठरला ३५० बळी
रवींद्र जाडेजाचा ३५०वा कसोटी बळी ठरला तो केसरा नुवांथा. सामन्याच्या ६७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नुवांथाने ऑफ साइडला ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या गुडघ्याला लागून हवेत उडाला आणि शुभमन गिलने झेल टिपला. त्यामुळे जाडेजाला आपला ३५० व्या विकेट्सचा टप्पा ओलांडता आला.
तिसऱ्या स्थानी दाखल
जाडेजा आता जगातील सर्वात यशस्वी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात तो आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात रंगना हेरथ (४३३) आणि डॅनियल व्हेटोरी (३६२) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडच्या डेरेक अंडरवुड (२९७) आणि बांगलादेशचा तैजुल
इस्लाम (२७१) यांना मागे टाकले आहे.
हिंदुस्थानचा पाचवा खेळाडू ठरला
हिंदुस्थानसाठी ३५० किंवा त्याहून अधिक कसोटी विकेट्स घेणारा जाडेजा हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे (६१९), रविचंद्रन अश्विन (५३७), कपिल देव (४३४) आणि हरभजन सिंग (४१७) यांनीच हा पराक्रम केला होता.
दिग्गज अष्टपैलूंच्या क्लबमध्ये सामील
एक अष्टपैलू म्हणून जाडेजाने कसोटी इतिहासातील सर्वात अनोख्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. कसोटी क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात केवळ तीन दिग्गजांनी ४,००۰ पेक्षा जास्त धावा आणि ३५० पेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. भारताचे कपिल देव (५,२४८ धावा, ४३४ बळी), इंग्लंडचे सर इयान बोथम (५,२०० धावा, ३८३ बळी) आणि न्यूझीलंडचे डॅनियल व्हेटोरी (४,५३१ धावा, ३६२ बळी). आता जाडेजादेखील या दिग्गज अष्टपैलूंच्या क्लबचा भाग बनला आहे.

























































