
कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेदरम्यान राज्यातील पहिल्या मसुदा मतदार यादीतून तब्बल १.०८ कोटी मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेअंतर्गत ५.५४ कोटींहून अधिक फॉर्मचे वाटप करण्यात आले होते, ज्यापैकी सुमारे ४.४६ कोटी फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ६५,६१,६०७ मतदार कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. तर ६,३८,८३९ मृत मतदारांची नोंद आढळली आहे. घरोघरी केलेल्या सर्वेक्षणात १५,२८,९८५ मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत. ७,०७,७९२ मतदारांच्या नोंदी बनावट अथवा एकापेक्षा जास्त ठिकाणी (डुप्लिकेट) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्रातील मतदार यादीतून २ कोटी नावं हटवली, रोहित पवार यांचा आरोप
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान राज्यभरातून २ कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून कमी झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.





























































