
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. 18 ऑगस्टच्या मध्यरात्री भिंड-ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्ग ७१९ वर छिमका गावाजवळ पिकअप ट्रक आणि डंपरची समोरासमोरून जोरदार धडक झाली. या भीषण दुर्घटनेत आठ मजुरांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 32 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावर अचानक गायींचा कळप समोर आला. या गायींना वाचवण्याच्या प्रयत्नात पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव पिकअप थेट समोरून येणाऱ्या डंपरवर जाऊन आदळली. या पिकअप ट्रकमध्ये मोठ्या संख्येने मजूर प्रवास करत होते. हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील रहिवासी असून मध्य प्रदेशातील डबरा परिसरातील चिनाउर भागात भात लावणीच्या कामासाठी आले होते. लावणीचे काम पूर्ण करून सर्व मजूर याच पिकअप गाडीने आपल्या मूळ गावी परतत असताना हा भीषण अपघात घडला.
अपघाताचा जबरदस्त आवाज ऐकून स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच गोहद चौराहा पोलीस ठाण्याचे पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने गोहद येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना पुढील तातडीच्या उपचारासाठी ग्वाल्हेर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे लखीमपूर खेरी येथील मजुरांच्या कुटुंबांवर आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.




























































