
महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेची मुदत संपली असून 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत राज्यातील 2.08 कोटींपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे 21.25 टक्के मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातील 36.6 लाख म्हणजेच 35.24 टक्के मतदार या प्रक्रियेत वगळले जाण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. वगळण्यात येणाऱ्या मतदारांची अंतिम संख्या निवडणूक आयोग येत्या सोमवारी जाहीर करणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानुसार, सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील एकूण 9,78,54,049 मतदारांपैकी 2,07,93,916 मतदारांचे गणना अर्ज ‘नॉन-कलेक्टिबल’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. म्हणजेच, मतदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) गेले असता संबंधित मतदारांचा ठावठिकाणा लागला नाही.
यामध्ये मतदार घरात नसणे, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे, मृत्यू झालेला असणे किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नोंद असणे अशा कारणांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असलेल्या मतदारांना ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे. संबंधित मतदारांकडून गणना प्रक्रियेदरम्यान कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे अर्ज ‘नॉन-कलेक्टिबल’ म्हणून नोंदवण्यात आले.
मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार बेपत्ता
मुंबईतील वरळी, मानखुर्द शिवाजीनगर, मालाड पश्चिम, कुलाबा आणि मलबार हिल या मतदारसंघांमध्ये ठावठिकाणा न लागलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, बोरिवली आणि मुलुंड या मतदारसंघांमध्ये गणना झालेल्या मतदारांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये गणना प्रक्रियेतील आकडेवारी कमी राहिली आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ASDD श्रेणीतील ज्या मतदारांचा अनेकदा प्रयत्न करूनही BLOना ठावठिकाणा लागलेला नाही, अशा मतदारांची नावे पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत असण्याची शक्यता कमी आहे.
अंतिम आकडेवारी मंगळवारी जाहीर होणार
SIR प्रक्रियेतील अंतिम आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी जमा झालेल्या सुमारे 47,000 गणना अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडे समोर येतील. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना 1 महिन्याचा कालावधी सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी दिला जाणार आहे. पात्र मतदाराचे नाव प्रारूप यादीतून वगळले गेले असेल तर, संबंधित मतदाराला या निर्णयाला हरकत घेऊन आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे.
काँग्रेस आमदार अमीन पटेल यांची तक्रार
दरम्यान, SIR प्रक्रियेतील आकडेवारीवर काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. BLOनी पात्र मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचवले नसल्याची तक्रार त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. BLO पात्र मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत आणि त्यांच्या सध्याच्या वास्तव्याची पडताळणी न करताच त्यांना कायमस्वरूपी स्थलांतरित म्हणून नोंदवण्यात आले, असा आरोप अमीन पटेल यांनी केला आहे.
यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुंबादेवी मतदारसंघाचे उदाहरण दिले. मुंबादेवी मतदारसंघात एकूण 2,41,959 मतदार असून त्यापैकी 95,538 म्हणजेच सुमारे 39 टक्के मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा मृत असल्याचे दाखवण्यात आले आहे, असा दावा अमीन पटेल यांनी केला.



























































