TISS ने दीक्षांत समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांच्या यादीतून CJI सूर्य कांत यांना वगळले, काय आहे कारण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (TISS) ८६ व्या दीक्षांत समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांच्या यादीतून सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे नाव वगळण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संभाव्य विरोधाच्या आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने हा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या जागी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, TISS चा दीक्षांत समारंभ यापूर्वी २ ऑगस्ट रोजी होणार होता आणि सरन्यायाधीश सूर्य कांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमाच्या अवघे ४८ तास आधी अपरिहार्य कारणास्तव समारंभ पुढे ढकलण्यात आल्याचा ई-मेल प्रशासनाकडून पाठवण्यात आला. टीव्ही९ भारतवर्षने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, बेरोजगार तरुणांना उद्देशून सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी वापरलेल्या झुरळ या शब्दावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. याच कारणामुळे TISS कॅम्पसमध्ये त्यांच्या उपस्थितीला विद्यार्थ्यांकडून मोठा विरोध होण्याची आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.

प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आणि कॅम्पसमधील शांतता भंग होऊ नये म्हणून कार्यक्रम पुढे ढकलला होता. आता हा ८६ वा दीक्षांत समारंभ शनिवार, २२ ऑगस्ट रोजी देवनार येथील नौरोजी कॅम्पसमध्ये नव्याने आयोजित केला जाणार आहे. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याऐवजी डॉ. सी. एस. प्रमेश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे बदलण्याचा निर्णय सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या सहमतीने झाला की संस्थेने सुरक्षेच्या कारणास्तव स्वतः घेतला, यावर TISS अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असं वृत्तात सांगण्यात आले आहे.