
चीनविरुद्धच्या सामन्यात 2-2 अशी थरारक बरोबरी साधणाऱ्या हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने हॉकी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल षटकार ठोकत आपले स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता अखेरचा साखळी सामना बलाढय़ इंग्लंडविरुद्ध गुरुवारी खेळला जाणार असून, जो संघ जिंकेल तोच बाद फेरी गाठेल. तसेच चीनची लढत बाद झालेल्या दक्षिण आफ्रिकेशी होणार असल्यामुळे त्यांची बाद फेरी निश्चित मानली जात आहे. आज हिंदुस्थानच्या महिलांनी आफ्रिकन संघाची अक्षरशः धुळधाण उडवली. 11 व्या मिनिटाला सुनेलीटा टोप्पो हिने पहिला गोल ठोकत खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात नवनीत कौर आणि सुशीला चानूने गोल करत हिंदुस्थानला 3-0 अशी निर्विवाद आघाडी मिळवून दिली. मग तिसऱ्या सत्रात दीपिका, लालरीमसियामी आणि साक्षी राणा यांनी तीन गोल ठोकत हिंदुस्थानला 6-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

























































