मृत्युदंडासाठी तूर्त फाशीच, विषारी इंजेक्शन, शॉक आणि गोळी झाडण्याचे पर्याय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फासावर लटकवून मृत्युदंड देण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी अन्य वेदनारहित पर्यायांचा वापर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. ‘कमीत कमी वेदना देणारी दुसरी पद्धत असल्याचे वैद्यकीयदृष्टय़ा सिद्ध झाल्यास त्यावर विचार करता येऊ शकतो. केंद्र सरकारने त्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याचा विचार करावा,’ असे मत न्यायालयाने मांडले.

ज्येष्ठ वकील ऋषी मल्होत्रा यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. फासावर लटकवून मृत्युदंड देण्याच्या पद्धतीला त्यांनी विरोध केला होता. ‘फासावर लटकवल्यानंतर माणसाचा मृत्यू होण्यासाठी 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. तितका वेळ त्या व्यक्तीला यातना भोगाव्या लागतात. ही पद्धत रानटी, अमानुष व क्रूर आहेच, पण राज्यघटनेने दिलेल्या सन्मानाने मरण्याच्या हक्काचे उल्लंघन आहे, असे याचिकाकर्त्याने निदर्शनास आणले.