राम मंदिर देणगी चोरी, एसआयटीची चंपत राय यांना क्लीन चिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी चोरीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय व सदस्य अनिल मिश्रा यांना क्लीन चिट दिली आहे. एसआयटीने आपला अंतिम अहवाल नुकताच उत्तर प्रदेश सरकारला सादर केला. या अहवालात चंपत राय व मिश्रा या दोघांचाही उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर असलेले बहुतेक सर्व पदाधिकारी हे सरकारने नेमले होते. त्यात आरएसएस, विश्व हिंदू परिषद, भाजपशी संबंधित लोक होते. चंपत राय हे ट्रस्टचे मुख्य कारभारी होते. लुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर चंपत राय व मिश्रा यांच्यावर प्रामुख्याने आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, मात्र आता एसआयटीनेही त्यांना क्लीन चिट दिली आहे. यूपी सरकारच्या एसआयटी अहवालात आठ जणांची नावे आहेत. हे सगळे आरोपी आधीपासूनच अटकेत आहेत.

टांगती तलवार कायम

यूपी सरकारच्या एसआयटीकडून राय यांना क्लीन चिट मिळाली असली तरी त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आणखी एक पथक राम मंदिर लुटीची चौकशी करत आहे. ती चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या पथकाचा अहवाल आल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.