
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, दंडपेठ्या जोड, मोठ्या हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एकपदरी, लहान व मोठे शिरपेच, तोडे जोड, मोहरांची माळ, तुळशीची माळ तीनपदरी, सोन्याचे पैंजण जोड, अष्टपैलू मण्याची कंठी आठपदरी, अष्टपैलू मण्याची कंठी तीनपदरी, पुतळ्यांची माळ, लक्ष्मीहार व मत्स्य जोड आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
श्री रुक्मिणीस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदका, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी परिधान करण्यात आले. अलंकार परिधानामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार यांनी दिली.




























































