
आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्याचे सरकारनेच सांगितले आहे. त्यामुळे जेवढ्या नोंदी सापडल्या आहेत, तेवढी कुणबी प्रमाणपत्रे वाटप करा, नसता सरकार पाडतो, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी २८ ऑगस्टपर्यंत सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी वेळ आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास २९ ऑ गस्टपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. या विषयावर मराठा समाजात जागृती करण्यासाठी २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ओबीसी नेत्यांकडून होत असलेल्या टीकेचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात असताना मंत्रिमंडळातील काही मंत्री आडकाठी आणत आहेत, त्याचा खरपूस समाचार घेत मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठ्यांचे तळतळाट घेऊ नये, असे म्हटले. एकनाथ शिंदेनी शिरसाटांना आणि फडणवीसांनी बावनकुळेंना सांगून प्रमाणपत्र देण्याचे थांबवल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.






























































