
पुण्यातील चाकण MIDCला भेट देऊन स्थानिक रहिवासी, उद्योजक आणि माध्यमांशी संवाद साधल्यानंतर उद्योगमंत्री चाकणला भेट देण्यासाठी रविवारी आले, असे विधान शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. चाकण MIDC मधील खराब रस्ते, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा आणि विशेषतः मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत चाकणच्या औद्योगिक क्षेत्रातील परिस्थितीवर भाष्य केले. “चाकण MIDCला भेट देऊन रहिवासी, उद्योजक आणि माध्यमांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांना रविवारी चाकणला भेट द्यावी लागली,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
चाकणमधील औद्योगिक क्षेत्रात खराब रस्ते, सतत खंडित होणारा वीजपुरवठा आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या औद्योगिक क्षेत्राला अविश्वसनीय भ्रष्टाचाराने पोखरले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील 36,211 उद्योग एकतर बंद झाले किंवा राज्याबाहेर गेले, अशी अधिकृत माहिती सरकारने दिली आहे. उद्योगमंत्र्यांनी रविवारी चाकणला भेट देऊन प्रत्यक्ष समस्या पाहण्याऐवजी अनेक घोषणा केल्या. यापूर्वीही इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
“भ्रष्टाचार असाच सुरू राहणार आहे का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. MIDCमध्ये भूखंड वाटपापासून पुढील प्रक्रियेपर्यंत प्रत्येक चौरस मीटरमागे ठरावीक दराने पैसे घेतले जात असल्याची चर्चा उद्योग क्षेत्रात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चाकणमधील रस्त्यांची जबाबदारी अनेक सरकारी यंत्रणांकडे असल्याने या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे रस्त्यांच्या समस्येवर तोडगा निघत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आपल्या चाकण भेटीची घोषणा करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला कचरा अनेक दिवस उचलण्यात आलेला नव्हता, असा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्रात नवीन उद्योग आणायचे असतील, तसेच विद्यमान उद्योग राज्यात टिकवून ठेवायचे असतील, तर परिस्थितीत बदल होणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. भ्रष्टाचार, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि सरकारी यंत्रणांमधील दिरंगाईमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासावर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पुण्यातील हिंजवडी औद्योगिक परिसराचाही असाच प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हिंजवडीतील मेट्रोचे काम दीर्घकाळ रखडले आहे. त्याचबरोबर रस्ते आणि पुलांची कामेही सुरूच असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास मोठा वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज हिंजवडीला भेट देणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. सरकार केवळ कागदावर घोषणा करते. प्रत्यक्षात मात्र समस्यांचे निराकरण होत नाही, असा आरोप त्यांनी केला.
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) रोजगार कमी होणे आणि विद्यमान नोकऱ्यांची जागा AI घेण्याबाबत चर्चा सुरू असताना महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि सरकारच्या दिरंगाईमुळे कंपन्या राज्याबाहेर जात असल्याने होणाऱ्या रोजगाराच्या नुकसानीची दखल मुख्यमंत्री घेत नसल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यातील रोजगार टिकवण्यासाठी सरकारने केवळ घोषणा न करता औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे .
🚨 The Impact 🚨
of our visit to Chakan MIDC and interaction with the residents, industrialists and the media is that the Industries Minister of Maharashtra had to visit it on Sunday.
Terrible roads, tripping electricity supply, poor water supply and more importantly, the…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 18, 2026



























































