
‘पुष्पा’ नंतर अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटांकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यापैकी दिग्दर्शक अॅटली यांचा बहुप्रतिक्षित सायन्स-फिक्शन चित्रपट ‘राका’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दीपिका पदुकोण दिसणार असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता चित्रपटाच्या खलनायकाच्या भूमिकेसाठी हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथचे नाव चर्चेत आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विल स्मिथला ‘राका’मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून याबाबत निर्माते आणि अभिनेत्यामध्ये चर्चा सुरू असल्याचेही म्हटले जात आहे. अखेर परदेशातील चित्रीकरणासाठी त्याचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
विल स्मिथ या चित्रपटात सहभागी झाला तर ‘राका’ची स्टारकास्ट निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत येऊ शकते. अल्लू अर्जुन आणि विल स्मिथ यांच्यात पडद्यावर होणारी टक्कर पाहणे चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार केला जात असून त्यात भव्य अॅक्शन आणि सायन्स-फिक्शन घटक पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार विल स्मिथच्या कास्टिंगबाबत अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या त्याच्या सहभागाची चर्चा केवळ मीडिया रिपोर्ट्सपुरतीच मर्यादित आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान सुद्धा ‘राका’मध्ये दिसणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, नंतर या चर्चांना दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, ‘राका’च्या पुढील शेड्यूलच्या चित्रीकरणाची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. सप्टेंबरनंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला वेग येण्याची शक्यता असून, परदेशातील लोकेशन आणि विल स्मिथच्या उपलब्ध तारखांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
विल स्मिथने खरोखरच ‘राका’मध्ये खलनायकाची भूमिका स्वीकारली, तर अल्लू अर्जुन विरुद्ध विल स्मिथ अशी अनोखी ऑनस्क्रीन टक्कर पहिल्यांदाच पाहायला मिळू शकते. मात्र, यासाठी निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

























































