
अमृतसरहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला पक्षी धडकला. यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. उड्डाणाच्या आधीच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे IX-1694 हे विमान पहाटे 4.25 च्या सुमारास अमृतसरहून पुण्याला जाणार होते. मात्र उड्डाणाच्या अगदी आधी विमानाला एका पक्ष्याची धडक बसली. सुरक्षेचा विचार करून एअरलाईन्सने विमान तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
एअर इंडिया एक्सप्रेसने विमानतळ संचालकांना पत्र पाठवून उड्डाण रद्द झाल्याची पुष्टी केली. उड्डाण रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर विमानतळावर गोंधळ उडाला. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि ग्राऊंड स्टाफने विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवले. त्यानंतर प्रवाशांचे सामान टर्मिनल इमारतीत परत आणण्यात आले.

























































