मुंबई-दिल्ली ट्रेनमध्ये सहप्रवाशांवर अग्निशमन यंत्राचा फवारा उडवला, परदेशी नागरिकाचा कोठडीत मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-दिल्ली गोल्डन टेम्पल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका परदेशी नागरिकाचा सहप्रवांशासोबत वाद झाला. या वादातून त्याने सहप्रवाशांवर अग्निशमन यंत्राचा फवारा उडवला. यानंतर रेल्वे पोलिसांनी सदर परदेशी नागरिकाला ताब्यात घेत आरपीएफ चौकीत नेले. काही तासांनंतर चौकीतच तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सदर परदेशी नागरिक गोल्डन टेम्पल एक्सप्रेसने मुंबईतील वांद्रे टर्मिनसवरून दिल्लीला जात होता. यादरम्यान जनरल डब्यात एक परदेशी नागरिक प्रवाशांशी वाद घालत असून गोंधळ निर्माण करत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली.

आरपीएफच्या जवानांनी जनरल डब्यात पोहोचत त्याला इंग्रजी भाषेतून शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अधिकच आक्रमक झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्याने प्रवाशांवर अग्निशमन यंत्राचा फवारा उडवला. यामुळे काही संतप्त प्रवाशांनी त्याला जाब विचारला आणि त्याच्यावर हात उचलला.

ट्रेन सुरतला पोहोचताच रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीला आरपीएफ चौकीवर नेले. चौकशीदरम्यान तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत परदेशी व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे होते, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, त्याच्याकडे कोणताही पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर ओळखपत्रे सापडली नाहीत. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.