जलजीवन मिशनमध्ये धक्कादायक कारभार; पंपिंग रूममध्ये पाणी, चालू वीज मीटर धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बांईंगवाडी येथील जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही योजना अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप असून, नव्याने बांधण्यात आलेल्या पंपिंग रूममध्ये मुसळधार पावसाचे पाणी गळून ते थेट कार्यरत वीज मीटरच्या परिसरात साचत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सक्रिय सदस्य निलेश अशोक सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी खर्च होऊनही योजना पूर्णत्वास न गेल्याचा तसेच बांधकामाच्या दर्जाबाबत तक्रारीत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. कोंडगाव-बांईंगवाडी येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जुनी पंपिंग रूम पाडून त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र, पावसाळ्यात या नवीन बांधकामातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी जुन्याच कार्यरत वीज मीटरचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवीन पंपिंग रूममधून गळणारे पाणी चालू वीज मीटरच्या परिसरात पोहोचत असल्याने पाणी सोडण्यासाठी किंवा यंत्रणेची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी आणि वीज यांचा थेट संपर्क येण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. या धोकादायक परिस्थितीबाबत कोंडगाव ग्रामपंचायतीकडेही तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होणे ही गंभीर बाब आहे. योजना अपूर्ण का राहिली, बांधकामाचा दर्जा कसा तपासण्यात आला, पंपिंग रूममध्ये पावसाचे पाणी शिरण्याची परिस्थिती कशी निर्माण झाली आणि कार्यरत वीज मीटरला संभाव्य धोका निर्माण झाला असतानाही त्यावर तातडीने उपाययोजना का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

तक्रारदार निलेश सावंत यांनी या प्रकरणातील दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक ऑडिट करावे आणि वीज मीटरला निर्माण झालेला धोका तातडीने दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद प्रशासन, पाणीपुरवठा विभाग आणि कोंडगाव ग्रामपंचायत या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतात आणि दुर्घटना घडण्यापूर्वी कोणती पावले उचलतात, याकडे कोंडगाव-बांईंगवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.