
शेंगदाण्यांपासून ते बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्त्यांपर्यंत, विविध प्रकारच्या सुकामेव्यामध्ये असंख्य पोषक तत्वे आणि चांगले फॅट्स आढळतात. पण प्रत्येक पोषक तत्वाचा खऱ्या अर्थाने फायदा होण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या सुकामेव्याचा समावेश करावा हे तुम्हाला माहीत आहे का? प्रथिने, लोह, पोटॅशियम, ओमेगा-3 आणि सेलेनियम कोणत्या सुकामेव्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात? तुमच्या शरीररानुसार कॅल्शियमची गरज असल्यास कोणता सुकामेवा खावा? आपण अनेकदा असे म्हणतो की, जर शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर सुकामेवा खावा, पण प्रत्येक पोषक तत्वासाठी कोणता सुकामेवा खावा हे समजणे अनेकदा कठीण असते.
शेंगदाणे
वनस्पतींवर आधारित प्रथिन मिळवण्यासाठी शेंगदाणे हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच अनेक लोक नाश्त्यात ‘पीनट बटर’चा समावेश करतात.
बदाम
बदाममध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. बदामचा गुणधर्म उष्ण असल्याने ते मर्यादित प्रमाणात खावेत. रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी त्याचे साल काढून खाणे अधिक फायदेशीर ठरते.
काजू
शरीरात लोहाची कमतरता असल्यास काजू खाणे फायदेशीर ठरते. काजू हा आयर्नचा चांगला स्रोत मानला जातो.
पिस्ता
पिस्त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
अक्रोड
डोळे, सांधे, हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा-3 फॅटी ॲसिड अक्रोडमध्ये सर्वाधिक आढळते.
ब्राझील नट्स
सेलेनियम हे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि थायरॉईड हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. यासाठी ब्राझील नट्स शरीरासाठी सर्वोत्तम मानले जातात.



























































