
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या शिवणे, बोरसू, माभळे आदी गावांमध्ये रानगव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. बोरसूत (पांगरशीव) येथील भातशेतीत काही दिवसांपूर्वी रानगव्यांचा कळप शिरल्याने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लावणीचा हंगाम संपल्यानंतर जोमाने बहरलेली भातपिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र, रानगव्यांच्या कळपाने शेतात प्रवेश केल्यानंतर काही तासांतच हे हिरवेगार शिवार उद्ध्वस्त झाले. गव्यांचे ढोपरभर खोल रुतलेले पाय आणि त्यांच्या वजनाखाली चिरडलेली भाताची रोपे पाहून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. काही ठिकाणी गव्यांनी रोपे खाल्ली असून, उर्वरित रोपे तुडवून टाकली आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने तयार केलेली भातशेती अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तुडवलेली रोपे आणि उरलेले खुंट पाहताना शेतकऱ्यांचा जीव तीळतीळ तुटत आहे.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मात्र, वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत आणि शेती परिसरात वाढता वावर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार,असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
आम्ही पिढ्यान्पिढ्या या जमिनीत शेती करत आलो आहोत. आमच्या पूर्वजांनी याच जमिनीवर पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आता मात्र वन्यप्राणी राजरोसपणे शेतात येऊन पिकांचे नुकसान करीत आहेत. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाला कारणीभूत ठरणारा हा मार्ग कोणी खुला केला? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
रानगव्यांच्या वाढत्या वावरामुळे केवळ बोरसूतच नव्हे, तर शिवणे, माभळे आणि परिसरातील इतर गावांतील शेतकरीही धास्तावले आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीची भरपाई मिळविण्याची प्रक्रिया अनेकदा शेतकऱ्यांसाठी जिकिरीची ठरत असल्याने काही शेतकरी जंगलालगतची शेती करण्यापासूनही परावृत्त होत आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षणासोबतच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.





























































