
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ताम्हाणे मार्गावर आज दुपारी दीडच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आंबवली गावातील प्रतीक सावंत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोसुंब ताम्हाणे या मार्गांवर चिरे भरलेल्या ट्रकची नियमित वाहतूक असते. या गाड्यांच्या वेगावरून परिसरात नेहमीच संताप व्यक्त केला जात असतो. त्यातच पावसाळ्यात चिरे खाणींना परवानगी नसतानाही हे ट्रक भरधावं वेगाने धावत असतात. यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी होतं आहे. आज दुपारच्या दरम्यान एम एच हा भरधाव वेगाने चिरे घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात प्रतीकचा मृत्यू झाला.
सदर ट्रक महसूल विभागातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगण्यात आले. ताम्हाने कोसुंब रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून आता तरी संबंधित विभागाला जाग येईल का , असा संतप्त सवाल विचारला जात आहे. प्रतीक सावंत या तरुणाचा अपघाती मृत्यू ओढवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



























































