संगमेश्वर तालुक्यात बेकायदा वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास, पत्रकार संघ आंदोलनाच्या पवित्र्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील हिरवागार डोंगर सध्या उजाड होत चालले आहेत. शासन एकीकडे लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवडीची मोहीम राबवत असताना, दुसरीकडे मात्र तालुक्यात बेकायदा आणि बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधात आता संगमेश्वर तालुका पत्रकार संघ आक्रमक झाला असून लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील विविध भागांतून वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडून जमीन सपाट केली जात आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि इतर वाहने वापरून लाकडे चोरून नेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामध्ये मौल्यवान साग, ऐन, हिरडा यांसारख्या झाडांचाही समावेश आहे. या बेकायदा कृत्यामुळे डोंगराच्या डोंगर उजाड झाल्याने मृदा धूप, पाणी टंचाई आणि वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे ही वृक्षतोड रोखण्यासाठी जबाबदार असलेल्या वन विभागाकडूनच याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. शासन पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करून वृक्ष लागवड मोहीम राबवत असताना, वन विभागाच्या नाकाखालीच शासनाच्या या मोहिमेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी निधी येत असला तरी त्याच्या देखभालीकडे आणि संरक्षणाकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लावलेली रोपे जगण्यापेक्षा तोडली जाणारी झाडे जास्त आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यात भर म्हणून तालुक्यातील काही भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील झाडांचीही चोरी होऊ लागली आहे. शेत बांधावर लावलेली फळझाडे आणि इतर झाडे अज्ञात व्यक्ती तोडून घेऊन जात आहेत. याबत शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडे या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. आपल्या तक्रारींना दाद न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी संगमेश्वर तालुका पत्रकार संघाकडे धाव घेतली आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. शेतकऱ्यांच्या या तक्रारींची दखल घेत संगमेश्वर तालुका पत्रकार संघाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तालुक्यात होत असलेली बेकायदा वृक्षतोड ही केवळ कायद्याचा भंग नसून येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे. शासन पर्यावरण वाचवण्यासाठी एका बाजूने प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूने काहींच्या हव्यासापोटी निसर्गाची नासधूस केली जात आहे. वन विभागाच्या उदासीनतेमुळे ही वृक्षतोड वाढली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता पत्रकार संघाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

सुरेश सप्रे पुढे म्हणाले की, लवकरच पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व संवेदनशील नागरिकांना सोबत घेऊन या बेकायदा वृक्षतोडी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे यासारख्या टप्प्यांचा समावेश असेल. जोपर्यंत बेकायदा वृक्षतोड थांबत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. एकीकडे जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणीय संकटाचा सामना करत असताना संगमेश्वरसारख्या निसर्गसंपन्न तालुक्यात होत असलेली ही वृक्षतोड निश्चितच चिंताजनक आहे. आता प्रशासन आणि वन विभाग या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.