वांद्रेतील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्याचा डाव, प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; आज तातडीने सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे रेक्लेमेशन येथील नेव्हील डिसुझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घाट पालिका आणि म्हाडाने घातला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेच्या सुधार समितीने घाईघाईने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या याचिकेवर उद्या गुरुवारी तातडीने सुनावणी निश्चित केली. तसेच महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे आढळल्यास त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, अशी तंबी प्रशासनाला दिली.

मैदानाचे आरक्षण बदलू नये अशी मागणी करत मुंबई फुटबॉल असोसिएशनने याविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. झाल अंद्यार्जुना यांनी महापालिकेच्या महासभेने आरक्षण बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी मैदानाला तातडीने संरक्षण देण्याची मागणी केली. यावर न्यायमूर्ती घुगे यांनी, त्या दिवशी जे घडले त्यानुसार एखादा निर्णय योग्य नसल्याचे आम्हाला वाटले तर आम्ही त्यावर कारवाई करू, असा इशारा दिला.