
मणिपूरमधील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता, राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 20 ते 22 ऑगस्टदरम्यान राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात NRC आणि 2027 च्या जनगणनेपूर्वी सीमांकनाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, माध्यमिक शिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक शिक्षण परिषद, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संलग्न शाळा तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठे 20 ते 22 ऑगस्टपर्यंत बंद राहतील.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जस्टिफाइड अँड फेअर डिलिमिटेशन’ (JFD) या गटाने जनगणना प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मणिपूरच्या खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने, मोर्चे आणि राजकीय नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. JFD ने गुरुवारपासून सर्व सरकारी कार्यालयांवर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले आहे.
मणिपूरमध्ये NRC लागू करण्याची मागणी काही मैतेई संघटनांकडून केली जात आहे. 1951 नंतर शेजारील देशांमधून राज्यात आलेल्या आणि राज्याच्या मूळ रहिवाशांसाठी धोका निर्माण करू शकणाऱ्या अनोंदणीकृत स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी NRC आवश्यक असल्याचा त्यांचा दावा आहे. कुकी संघटनांनी या मागणीला विरोध केला आहे. मैतेई संघटना राज्यातील अनेक लोकांना अनोंदणीकृत स्थलांतरित ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कुकी संघटनांनी केला आहे. त्यामुळे NRC आणि सीमांकनाचा मुद्दा मणिपूरमध्ये अधिक संवेदनशील बनला आहे.





























































