आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या ताटात शिळी, निकृष्ट भाजी; कर्जतमधील आदिवासी समाज संघटनेने केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसांड सुरू आहे. शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करत असले तरी शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट दर्जाची भाजी पोहोचत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजी घेऊन येणारा टेम्पो अडवून ही पोलखोल केली.

कर्जत तालुक्यात पाथरज-डोंगरपाडा, चाफेवाडी, पिंगळस, भक्ताचीवाडी, माणगाववाडी, भालिवडी आणि कळंब अशा सात आदिवासी आश्रमशाळा आहेत. विद्यार्थ्यांना रोज ताजी भाजी मिळणे अपेक्षित असताना गुरुवारी भाजीचा पुरवठा झाल्यानंतर थेट सोमवारी पुन्हा भाजी पोहोचविण्यात आल्याचे समोर आले.

कर्जत तालुक्यातील आश्रमशाळांसाठी भाजी पुरवठ्याचे कंत्राट गजानन महाराज कॅटरर्स यांच्या नावावर आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून भाजीच्या निकृष्ट दर्जाबाबत जाब विचारला. यानंतर आश्रमशाळा प्रशासनानेही भाजीच्या दर्जाबाबत वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार दिली आहे.

गेटवरच टेम्पो अडवला
आश्रमशाळेच्या गेटवरच टेम्पो अडवून भाजीची पाहणी केली असता केळी काळी पडलेली, दुधीवर काळे डाग, कोबी काळसर पडलेली तसेच अन्य भाज्याही खराब झाल्या होत्या. सडक्या भाज्या देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सचिव नितीन निरुगडा यांनी केला आहे.