उरणमधील ८४ हजार मतदार नॉट रिचेबल, २ लाख ७२ हजार मतदारांची यादी सोमवारी प्रसिद्ध होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

निवडणूक आयोगाने घेतलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत उरणमध्ये ८४ हजार ५०४ मतदार नॉट रिचेबल असल्याचे उघड झाले आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील ३५५ मतदार याद्यांतील एकूण ३ लाख ५७ हजार २५५ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ७५३ मतदराचे अर्ज जमा झाले आहेत. निवडणूक आयोगाकडे जमा झालेल्या अर्जाचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून प्रारूप मतदार यादी येत्या २४ ऑगस्ट रोजी सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

एस आय आर विधानसभा मतदारसंघातील ३५५ खानाच्या भागाची प्रारूप यादी येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर मतदारांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यानच्या मालतीत हरकती व दावे दाखल करण्याचा कालावधी आहे.

२४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर हरकती व दावे निकाली काढायचा कालावधी आहे. अंतिम यादी येत्या २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही तहसीलदार कदम यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रायगड जिल्हा प्रशासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील ३५५ यादीच्या भागातील नोंदणी असलेल्या एकूण ३ लाख ५७ हजार २५५ मतदारांचे पुनरिक्षण करण्यात आले. पुनरिक्षण मोहिमेत ईएफ डिजिटलायझेशन २ लाख ७२ हजार ७५३ (७६.३५ टक्के) फॉर्म जमा झाले आहेत. मयत, स्थलांतरित, अनुपस्थितांचे ८४ हजार ५०२ (७६.३५ टक्के) फॉर्म मुदतीत जमा झालेले नाहीत. या मतदरांशी कोणताही संपर्क झालेला नसल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

नवी मुंबईत ३ लाख ८१ हजार नावे वगळणार
नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रांमध्ये सुमारे ९ लाख १९ हजार ६९७ मतदार नोंदणीकृत आहेत. मात्र एसआयआर माहिमेमध्ये त्यापैकी ३ लाख ८१ हजार ४८३ मतदारांचे अर्ज जमा झालेले नाहीत. ऐरोलीत ४ लाख ९७हजार ३८० मतदारांपैकी फक्त २ लाख ७८ हजार २२८ मतदारांचे अर्ज जमा झाले आहेत. बेलापूरमध्ये ४ लाख २२ हजार ३१७ मतदारांपैकी फक्त २ लाख ५६ हजार ९८६ मतदारांचे अर्ज जमा झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील २९ लाख मतदार गेले कुठे?
ठाणे जिल्ह्यात एकूण ७४ लाख ८० हजार ५१५ मतदार नोंदणीकृत आहेत. मात्र एसआयआर मोहिमेत सुमारे २८ लाख ९१ हजार ७५९ मतदार गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात फक्त ४५ लाख ८८ हजार ७५६ मतदारांचे अर्ज जमा झाले असून त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्याची एसआयआर मोहीम जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.