
यजमान श्रीलंकेला फिरकी जाळ्यात अलगद अडकवत हिंदुस्थानने गॉलमधील पहिल्या कसोटी क्रिकेट समन्यात १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. युवा फिरकीपटू मानव सुधारने दुसऱ्या डावात सहा बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे हिंदुस्थानने अखेरच्या दिवशी आवश्यक सहा बळी झटपट मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
हिंदुस्थानने पहिल्या डावात ४६२ आणि दुसऱ्या डावात १९३ धावा केल्या. श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांत आटोपला, तर दुसऱ्या डावात त्यांचा डाव २०६ धावांवर संपुष्टात आला. हिंदुस्थानकडून सुधारने सामन्यात दोन्ही डावांत मिळून दहा बळी घेतले. रवींद्र जाडेजाने तीन बळी मिळवून त्याला उत्तम साथ दिली.
श्रीलंकेसमोर विजयासाठी मोठे आव्हान असताना हिंदुस्थानला अखेरच्या दिवशी सहा बळींची गरज होती. श्रीलंकेच्या सोनल दिनुषा (८४) आणि धनंजय डी सिल्व्हाने (५९) अर्धशतके झळकवत हिंदुस्थानी गोलंदाजांचा कस पाहिला. हिंदुस्थानने संयमाने गोलंदाजी करत धावांना लगाम घातला. जाडेजाने धनंजयला बाद करत ही भागीदारी फोडली आणि त्यानंतर सुथारने श्रीलंकेच्या फलंदाजीवर अक्षरशः घणाघात केला.
सुथारचे १० चेंडूंत ४ बळी
टीम इंडियाला विजयासाठी बुधवारी अखेरच्या दिवशी सहा बळींची गरज होती. श्रीलंकेने ७५ षटकांत सहा बाद १९९ धावा करून सामन्यात रंगत आणली होतीः मात्र सुथारने पुढच्याच षटकात तीन बळी घेत श्रीलंकेच्या विजयाच्या आशा अक्षरशः संपवल्या. त्याने सोनल दिनुषा, प्रभात जयसूर्या आणि लाहिरू कुमारा यांना माघारी धाडले. पुढच्या षटकात केशरा नुवांथाला बाद करून सुधारने श्रीलंकेचा डाव गुंडाळला. सुधारने दिनुषाला ८४ धावांवर लेग-गलीमध्ये झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.
सुधारने अवघ्या १० चेंडूंत चार बळी घेत श्रीलंकेच्या प्रतिकाराचा शेवट केला. त्याने या मालिकेत दुसऱ्यांदा डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. सुथारच्या गोलंदाजीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अपेक्षेपेक्षा कमी वळण घेत चेंडू टाकण्याची त्याची अचूकता. त्याच्या मुख्य अस्त्राला पर्याय देत त्याने वेग आणि सीमचा प्रभावी वापर केला. त्यामुळे फलंदाजांना चेंडूच्या हालचालीचा अंदाज बांधणे कठीण झाले. हिंदुस्थानच्या गोलंदाजीची भिस्त केवळ सुथारवर नव्हती. जाडेजाने सातत्याने दबाव कायम ठेवला. वेगवान गोलंदाजांनी नियंत्रण राखत सामन्यात पाच बळी मिळवले आणि कुलदीप यादवनेही लय मिळवण्याच्या दिशेने पावले टाकली.
युवा आणि संक्रमणाच्या टप्प्यात असलेल्या हिंदुस्थानी संघासाठी डब्ल्यूटीसीं मध्ये टीम इंडिया पाचव्या स्थानी
गॉल कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेत ५३.३३ टक्के गुणांसह पाचवे स्थान मिळवले आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत १० कसोटींत पाच विजय, चार पराभव आणि एक सामना अनिर्णित असा प्रवास केला आहे. टीम इंडियाच्या खात्यात ६४ गुण आहेत. हिंदुस्थानला आता आणखी नऊ कसोटी सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेविरुद्ध एक, न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने बाकी आहेत. त्यामुळे टीम इंडियाला गुणतालिकेत मोठी झेप घेण्याची संधी आहे.
हा विजय विशेष महत्त्वाचा ठरला. फिरकीला अनुकूल परिस्थितीत मागील तीन मालिकांपैकी दोन गमावलेल्या हिंदुस्थानने यावेळी श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत नमवत दमदार प्रत्युत्तर दिले. खराब हवामान आणि संथ खेळपट्टीच्या आव्हानांवर मात करत भारताने अखेर गॉलमध्ये विजयाचा झेंडा रोवला.
सुथारने भज्जी, अश्विनला टाकले मागे
हिंदुस्थानी क्रिकेटच्या नव्या पिढीने गॉल कसोटी फिरकीला आपले शस्त्र बनवत श्रीलंकेला धूळ चारली. अवघ्या २४ वर्षाच्या मानव सुथारने आपल्या पहिल्याच परदेशी कसोटीत १० बळींचा विक्रम नोंदवत श्रीलंकेच्या भूमीवर हिंदुस्थानी फिरकीचा नवा अध्याय लिहिला. १३१ धावांत १० बळी घेत सुथारने हिंदुस्थानला १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिलाच, शिवाय हरभजन सिंग आणि रविचंद्रन अश्विनसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. सुथारने ४५.२ षटकांत १३१ धावा देत १० बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ५५ धावांत सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह श्रीलंकेच्या भूमीवर एका कसोटीत १० बळी घेणारा तो तिसरा हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. यापूर्वी हरभजन सिंग आणि अश्विन यांनी ही कामगिरी केली होती.
४९ वर्षांचा विक्रम मोडीत
गॉल कसोटीत सुथारने हिंदुस्थानचे महान डावखुरे फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचा तब्बल ४९ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडला. बेदी यांनी १९७७ मध्ये पर्थच्या वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९४ धावा देत १० बळी घेतले होते. सुधारने श्रीलंकेविरुद्ध १३१ धावांत १० बळी घेत विदेशी कसोटीत हिंदुस्थानी डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम १० बळींची कामगिरी आपल्या नावावर केली. इतकेच नव्हे तर, श्रीलंकेच्या भूमीवर हिंदुस्थानी गोलंदाजाने एका कसोटीत केलेली ही सर्वोत्तम सामन्यातील बळींची कामगिरी ठरली. हरभजनने २००८ साली गॉलमध्ये १५३ धावांत १० बळी घेतले होते, तर अश्विनने २०१५ मध्ये याच मैदानावर १६० धावांत १० बळी घेतले होते. सुथारने केवळ १३१ धावा खर्च करून या दोन्ही दिग्गजांना मागे टाकले.
५८ वर्षाचा विक्रम हुकला
सुधारच्या झंझावाती कामगिरीनंतर आणखी एका विक्रमाची चाहूल लागली होती. हिंदुस्थानच्या डावखुऱ्या फिरकीपटूची विदेशातील कसोटीत १० बळींची सर्वोत्तम कामगिरी करण्याबरोबरच तो ६/५५ या आकड्यांसह ५८ वर्षे जुना बापू नाडकर्णी यांचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर होता. नाडकर्णी यांनी १९६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४३ धावा देत सहा बळी घेतले होतेः मात्र ५५ धावांत सहा बळींवर त्याला समाधान मानावे लागले.
अवघ्या दोन कसोटींत १७ बळी !
मानव सुथारच्या कसोटी कारकिर्दीला अजून सुरुवातच झाली आहे. केवळ दोन कसोटींमध्ये त्याच्या खात्यात १७ बळी जमा झाले आहेत. गॉलमध्ये १० बळी घेण्यापूर्वीच त्याने आपल्या गोलंदाजीची झलक दाखवली होती. आता परदेशातील पहिल्याच कसोटीत १० बळी घेत त्याने टीम इंडियातील आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे.


























































