
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खातेधारकांसाठी सेवा शुल्कात बदल केले आहेत. बँकेने शाखेमार्फत रोख पैसे काढताना 1 ऑक्टोबर 2026 पासून एका महिन्यात केवळ चार वेळाच निःशुल्क पैसे काढता येणार आहेत.
पहिल्या चार मोफत व्यवहारांनंतर केल्या जाणाऱया प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 15 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल. यापूर्वी, चार मोफत व्यवहारांमध्ये डिजिटल व्यवहारांचा समावेश नव्हता. आता एसबीआयने नव्या नियमांनुसार ही सवलत काढून टाकली आहे.
‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाती प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी असतात. कोणत्याही शुल्काचा बोजा न पडता त्यांना बचतीची सवय लागावी, हा यामागचा उद्देश आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट नाही. मात्र, यात चेकबुकची सुविधा उपलब्ध नसते. पैसे काढण्यासाठी केवळ बँकेच्या शाखेत जाऊन ‘विड्रॉवल फॉर्म’चा वापर करावा लागतो किंवा एटीएमचा वापर करता येतो. एसबीआय बचत खाते उघडणाऱया ग्राहकांसाठी दरमहा जास्तीत जास्त चार वेळा रोख रक्कम काढणे मोफत असते.


























































