हॅनाची हृदयस्पर्शी कहाणी आता नाटकाच्या रूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅरेन लेवाइन यांच्या गाजलेल्या ‘हॅनाज सूटकेस’ या सत्यकथेवर आधारित ‘हॅनाची सूटकेस’ हा अभिनाट्य स्वरूपातील नाट्यप्रयोग एका साध्या, निरागस मुलीची हृदयस्पर्शी कहाणी उलगडतो. हॅना ब्राडी, १६ मे १९३१ आणि ‘अनाथ’ एवढीच माहिती असलेली ही सूटकेस २००० मध्ये जपानमधील टोकियो होलोकॉस्ट शिक्षण केंद्रात पोहोचली. केंद्राच्या प्रमुख फुमिको इशिओका यांनी या नावाचा शोध घेण्याचा ध्यास घेतला आणि हॅनाच्या आयुष्याचा मागोवा घेतला.

या मूळ पुस्तकाचा ‘ज्योत्स्ना प्रकाशन’तर्फे माधुरी पुरंदरे यांनी मराठी अनुवाद केला असून तो पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. या नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांनी केले आहे, तर ‘एप्रिल मे ९९’ फेम अभिनेत्री साजिरी जोशी यांनी हॅनाची भूमिका रंगवली आहे. नाटकात भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालत हॅनाचे आनंदी बालपण, नाझींचे अत्याचार आणि होलोकॉस्टची भीषणता प्रभावीपणे मांडली जाते.

हॅनाची कहाणी केवळ दुःख सांगत नाही, तर आठवण, प्रेम, माणुसकी आणि आशेचा संदेशही देते. इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या एका मुलीचा आवाज आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा संवेदनशील प्रयोग ठरतो.