
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीजेटीआय) वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला असून वसतिगृहाची अवस्था सध्या कैद्यांपेक्षाही वाईट झाली आहे. दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींतील बाथरूम व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आंघोळीकरिता गरम पाण्याची व्यवस्था कोलमडून पडली आहे. युवासेनेने वसतिगृहावर धडक देत या दुरवस्थेची पोलखोल केली.
व्हीजेटीआयच्या वसतिगृहाच्या दुरवस्थेबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्यांनी व्हीजेटीआय महाविद्यालयात जाऊन वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका माधुरी मांजरेकर, शाखाप्रमुख राकेश कांबळे, युवासेना विभाग अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, परम यादव, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना डॉर्मिटरीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येक दिवसासाठी 200 रुपये आकारले जातात; परंतु त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. दाटीवाटीने विद्यार्थ्यांना राहावे लागते. युवासेनेच्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रेक्टर डॉ. अभय बांबोले यांच्या वसतिगृहाची स्थिती निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याबाबत पुन्हा एकदा विद्यापीठाला जाब विचारण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत स्थानिक महापालिका कार्यालयात नगरसेविका माधुरी मांजरेकर तक्रार करून पाठपुरावा करणार आहेत.


























































