घाटकोपरमध्ये सासूने रचला सुनेच्या हत्येचा कट; तीन लाखांची सुपारी घेणारे कुटुंब गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारूच्या नशेत असलेल्या सुनेचा सासूने काटा काढला. कामवाल्या बाईला तीन लाखांची सुपारी देऊन सुनेच्या हत्येचा कट रचला आणि ठरल्याप्रमाणे रविवारी सहा जणांनी मिळून तिचा खून केला. बाथरूममध्ये डोक्यावर पडल्याने सुनेचा मृत्यू झाल्याचा बनाव सासूने रचला. पण पंतनगर पोलिसांनी शिताफीने तपास करत सासूसह कामवाल्या बाईच्या कुटुंबाला बेड्या ठोकल्या.

पंतनगरच्या लक्ष्मीनगरातल्या म्हाडा कॉलनीत धनलक्ष्मी भिक्षपती गंजी (60) आणि तिची सून सपना गंजी (35) राहतात. रविवारी दुपारी सपना दारू पिऊन आली म्हणून दोघींमध्ये भांडण झाले. तेव्हा भांडणामध्ये धनलक्ष्मी गंजी हिने सपनाच्या कानाखाली मारली व तिला ढकलून दिले. त्यामुळे ती बाथरूममध्ये पडली आणि डोक्याला मार लागल्याने सपनाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हा प्रकार कळताच पंतनगर पोलिसांनी धनलक्ष्मीला ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी सपनाच्या मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या गळ्याभोवती काळे-निळे डाग तसेच डोक्याच्या डाव्या बाजूला रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे धनलक्ष्मी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केल्यावर तिने सांगितले की, सपनाला दारूचे व्यसन होते आणि तिचे विवाहबाह्य संबंध होते. या व्यतिरिक्त सपनाने सासरच्या लोकांविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाणे येथे सन 2024 साली कलम 498 (अ), 377, 34 भादंविप्रमाणे गुन्हा नोंदवला होता आणि डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अन्वये तक्रार दाखल केली होती. सदरचा राग मनात होता आणि त्यातून हे कृत्य केले.