मोहम्मद अली जिन्ना यांच्या आजाराची माहिती गुप्त ठेवणाऱ्या मुंबईतील दोन डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दोन दिवंगत डॉक्टरांना पाकिस्तानने ‘निशान-ए-इम्तियाज’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. या डॉक्टरांनी 1947 मध्ये हिंदुस्थानच्या फाळणीच्या तोंडावर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या गंभीर आजाराची माहिती गुप्त ठेवली होती. डॉक्टर जल रतनजी पटेल आणि जल धायभोकू यांची या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे योजना विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पाकिस्तानचे योजना विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी म्हटलेय, ‘दोन्ही उत्कृष्ट डॉक्टरांना निशान-ए-इम्तियाज पुरस्कारासाठी नामांकित करताना मला अतिशय आनंद होत आहे. यातील एक जण उत्तम फिजिशियन होते तर दुसरे निष्णात रेडियोलॉजिस्ट होते. हे दोघेही पारसी समाजातील आहेत. त्यांच्यामुळे मोहम्मद अली जिन्ना यांच्या गंभीर आजाराचे गुपित मोजक्या लोकांपर्यंत मर्यादित राहिले. त्यांनी ही कामगिरी प्रामाणिकपणे पार पाडली.’ फाळणीआधी या दोन्ही डॉक्टरांनी जिन्ना यांच्या आजाराची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली होती. जिन्ना यांच्या आजाराबद्दल सर्वांना समजल्यास त्यांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम होईल, अशी भीती होती. त्यांच्या सतर्कतेमुळेच पुढे पाकिस्तानची निर्मिती झाली असल्याचे तेथील नेत्यांचे म्हणणे आहे.