कुणीही मोठा डाकू, चोर असो, शिवसेना चोरू शकत नाही; आदित्य ठाकरे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानेच सांगितलेय की, कुणाला पक्ष सोडायचा असेल तर तो राजीनामा देऊ शकतो, पण पक्षाची चोरी करून कुणी त्याचा मालक वा पक्षप्रमुख बनू शकत नाही. त्यामुळे कुणीही मोठा डाकू, डकैत किंवा चोर असला तरी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

वरळी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या युक्तिवादासंदर्भात प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते. संविधान कुणालाही पक्ष किंवा चिन्ह चोरी करण्याची सूट देत नाही. त्यामुळे शिवसेनेचे चोरलेले चिन्ह गद्दारांच्या हातातून जावे आणि शिवसेना पक्षाचे चोरलेले नाव त्यांच्याकडे राहू नये हीच शिवसेनेची मागणी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागेल असे भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणत असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, निकाल कोणाच्या बाजूला लागेल असे बोलण्याचा भाजपचा अधिकार आहे का? हा कोर्टाचा अपमान नाही का? कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न नाही का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

महापौर मुंबईकरांचा अवमान करताहेत
महापौर रितू तावडे यांचा महापालिका सभागृहातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचे उदाहरण देत यावेळी आदित्य ठाकरे यांनी महापौरांचा समाचार घेतला. महापौर मुंबईच्या नगरसेवकांवर आरडाओरड करताहेत, केकाटताहेत, गप्प राहायला सांगत आहेत असे त्या व्हिडीओत दिसतेय. हा मुंबईच्या लोकप्रतिनिधींचा, मुंबईकरांचा आणि महापौरांच्या खुर्चीचा अपमान आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.