नाशिकमधील पळसन येथील संतापजनक वास्तव, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांवर गारठ्यात जमिनीवर झोपण्याची वेळ; उघड्यावर धुवावे लागतात कपडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेत आवश्यक सोयीसुविधाही नसल्याने 440 विद्यार्थ्यांचे हाल होत आहेतं. पुरेशा कॉट्स नसल्याने भर गारठ्यात लहानग्यांना जमिनीवर कुडकुडत झोपावे लागते. प्रचंड दुरवस्थेमुळे शौचालये वापरायोग्यही उरलेली नाहीत. रात्री अंधारात उघडय़ावर कपडे धुण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे धक्कादायक वास्तव शिवसेना व शाळा व्यवस्थापन समितीच्या पाहणीत समोर आले. त्यांच्या शिक्षणासाठी असलेला कोटय़वधी रुपयांचा निधी प्रत्यक्षात जातो कुठे? असा संतप्त सवाल करण्यात आला आहे. त्वरित परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही देण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागाच्या कळवण एकात्मिक प्रकल्पांतर्गत असलेल्या पळसनच्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीच्या 440 विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शिक्षणासह निवासाची सोय आहे. त्यांना सेंट्रल किचनमधून जेवण पुरवले जाते. सुमारे 60 वर्षांपूर्वी बांधलेली ही दगडी इमारत आहे. येथे मंगळवारी रात्री शिवसेनेचे कृष्णा चौधरी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पंडित जाधव, अशोक गावीत यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी गैरसोयी समोर आल्या. कोटय़वधी रुपये खर्च होतात. मात्र, प्रत्यक्षात सुविधाच पुरवल्या जात नसल्याचे उघड झाल्याने भ्रष्ट यंत्रणेचा बुरखा फाटला आहे.

या ठिकाणी शौचालयांची संख्या कमी असून जे आहेत ते प्रचंड अस्वच्छ आहेत. त्यामुळे मुलांना शौचासाठी जंगलात उघडय़ावर जावे लागते. एकूणच अस्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुरेशा कॉट्स नसल्याने अक्षरशः गारठ्यात कुडकुडत जमिनीवर झोपावे लागते. विजेची सोय नसलेल्या भागात उघडय़ावर तसेच व्हरांडय़ात रात्री अंधारात चाचपडत कपडे धुवावे लागतात, हे वास्तव पाहणीत समोर आले.

कोट्यवधींचा निधी जातो कुठे?

सोयीसुविधांअभावी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवू पाहणाऱ्या या मुलांना सरकार कारागृहातील कैद्यांसारखे का वागवत आहे, त्यांच्यासाठीचा कोटय़वधींचा निधी जातो कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

सर्पदंशाची भीती

गडचिरोली जिल्ह्यातील एका अनुदानित आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने आश्रमशाळा दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पळसनच्या आश्रमशाळा इमारत आवारात गेल्या काही महिन्यांत शिक्षक, विद्यार्थ्यांनी तब्बल सात ते आठ साप पकडले. अस्वच्छ शौचालयांमुळे मुलांना उघडय़ावर शौचास जावे लागते, गडचिरोलीच्या घटनेनंतरही येथील सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रकारे सरकार मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

तत्काळ सुविधा पुरवाव्यात

आदिवासी विकास विभागाने या गंभीर प्रकाराची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा त्वरित पुरवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे कृष्णा चौधरी यांनी दिला आहे.