
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य तसेच वकिलाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपीला दणका दिला. विशेष न्यायाधीश वाय. पी. मनाथकर यांनी आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेसह दहा हजारांचा दंड ठोठावला. पापा शेख ऊर्फ शकील असे त्या आरोपीचे नाव आहे.
ऑक्टोबर २०१६ मध्ये चेंबूरच्या वाशीनाका येथील आरएनए कॉलनीजवळ हा प्रकार घडला होता. तक्रारदार अॅड. विनोद सातपुते यांनी त्यांची चारचाकी गाडी पार्क केली असता आरोपीने त्यांना अडवले. यापूर्वी त्याच्याविरुद्ध दाखल केलेली पोलीस तक्रार मागे घेण्याची मागणी त्याने केली. सातपुते यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. या घटनेनंतर सातपुते यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीच्या बचाव पक्षाने हा प्रकार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा दावा केला. तसेच घटनेचे समर्थन करणारे स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सादर केले नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. तक्रारदार आणि त्यांच्या भावाची साक्ष परस्पर सुसंगत असून घटनास्थळाच्या पंचनाम्यानेही त्याला पुष्टी मिळते; तसेच घटना निवासी इमारती आणि पानटपरीजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली असल्याने ती सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर घडल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.























































