
पुणे शहरात काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी तब्बल 30 अटी व शर्ती घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाली असून, या अटींमध्ये ड्रोनद्वारे शुटींग करण्यासाठी मनाई केली आहे. त्यासोबतच महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळी बैठक व्यवस्था करावी, विविध परवानग्या आधी घ्याव्यात असेही नमूद केले आहे. हा कार्यक्रम 22 ऑगस्टला एसएसपीएमएस कॉलेज मैदानावर पार पडणार आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, समान संधी आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यातच पुणे शहरात आगामी सण, विविध आंदोलने आणि मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर पोलिसांनी कार्यक्रमाला हिरवा पंदील दाखवला आहे; मात्र त्यासोबत तब्बल 30 अटींची यादी काँग्रेस आयोजकांच्या हाती दिली आहे. कार्यक्रमाला येणाऱया नागरिकांसाठी किमान चार प्रवेशद्वार ठेवणे, खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करणे, महिला सुरक्षेसाठी महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, असे सूचित केले आहे. या सर्व व्यवस्थांची जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात आली आहे.


























































