एका मतदारसंघात एकाच मतदाराचे 15 वेळा नाव; मतचोरी झाली… माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आकडेच दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतांची आकडेवारीच त्यांनी दिली आहे. या मतदारसंघात 27 हजारांहून अधिक दुबार मतदार आढळले असून अनेक मतदारांनी अनेक वेळा मतदान केले. एकाच मतदारसंघात एका मतदाराचे नाव 15 वेळा सापडले, असेही त्यांनी सांगितले. ही मतचोरी असून मतदारांची फसवणूकच आहे. भाजपने हे सगळे नियोजनबद्ध पद्धतीने केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘2019 ची निवडणूक मी जिंकलो होतो. त्यात मला 92 हजारांच्या आसपास मते होती. 2024 च्या निवडणुकीत 9 हजार मते जास्त मिळाली. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याहीपेक्षा कितीतरी जास्त मते मिळाली. अचानक इतके मतदार वाढल्यामुळे आम्ही मतदारयादीचा अभ्यास केला. तेव्हा मोठा घोटाळा समोर आला.

‘सर्वसाधारणपणे एका वर्षात मतदारसंख्येत 0.9 टक्क्यांची वाढ होते. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये पाच महिन्यांचे अंतर होते. या कालावधीत 0.4 टक्के वाढ अपेक्षित होती. मात्र, त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदार वाढले,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कराड दक्षिणमध्ये काय घडले?

कराड दक्षिण मतदारसंघात 3 लाख 15 हजार मतदार होते. त्यातील 21,132 मतदारांची नावे 48,741 ठिकाणी नोंदवली गेल्याचे आढळून आले. यातील अनेक मतदारांनी दोनदा, तीनदा, अनेकदा मतदान केले. इतकेच नव्हे, आसपासच्या मतदारसंघात 56,118 नावे दुबार आढळली आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

भाजपच्या बंद दाराआडच्या बैठकीत ठरले!

विधानसभेतील मतचोरीमागे भाजप असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजप घाबरला होता. त्यामुळे विधानसभेसाठी त्यांनी हमखास विजयासाठी रणनीती आखली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 सप्टेंबर 2024 रोजी नागपूरला आले होते. तिथे बंद दाराआड बैठक झाली. त्यात त्यांनी प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. देवेंद्र फडणवीसही तिथेच होते. त्यांनी शहांच्या आदेशानुसार हे सगळे करून घेतले. आरएसएसच्या कार्यकर्त्यांना मतदारांची नावे अनेक बूथवर नोंदवायला सांगितली, असा आरोप चव्हाण यांनी केला. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही, असेही ते म्हणाले.