स्वयंपाकघरात उंदीर आणि झुरळांचा वावर; मालाडचे हॉटेल राधा, खारघरच्या सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजचा अन्न परवाना निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वयंपाकघरात उंदीर आणि झुरळांचा वावर होत असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफडीएने आज मालाडच्या ‘हॉटेल राधा’चा अन्न परवाना निलंबित केला. खारघरच्या ‘सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज’लाही अशाच कारणास्तव कारवाईला सामोरे जावे लागले. अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या मोहिमेत एफडीएने आज राज्यभरात विविध ठिकाणी धडक कारवाई करून १४ लाखांचे खराब दुग्धजन्य पदार्थ आणि साडेअकरा लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

मालाडच्या ‘हॉटेल राधा’ची एफडीएने तपासणी केली तेव्हा स्वयंपाकघरातील उघड्या ड्रेनेजमधून आत घुसलेले उंदीर अन्नपदार्थांजवळ मुक्त संचार करत होते, तर अनेक झुरळे जेवणाच्या भांड्यांवरील उरलेले अन्न चाटत असताना आढळली. ड्रेनेजमधून स्वयंपाकघरात गळती होत होती आणि तिथेच भाज्या कापल्या जात होत्या. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत या हॉटेलचा अन्न परवाना निलंबित केला.

खारघरच्या ‘सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज’वरही अन्न परवाना निलंबनाची कारवाई केली गेली. तिथे स्वयंपाक बनवण्याच्या ठिकाणी किडे, मुंग्या व उंदीर प्रतिबंधक काहीच उपाय केले गेले नव्हते. तेथील अन्न व पाण्याची आवश्यक प्रयोगशाळा चाचणीही केली गेली नव्हती. कच्च्या मालाच्या खरेदीसंदर्भातील नोंदीही आढळल्या नाहीत. त्यामुळे या कॉलेजचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

जनता तवा अँड ग्रिल हॉटेलवर कारवाई

कुर्ला येथील ‘जनता तवा अँड ग्रिल’ या हॉटेलमध्ये कच्चे मांस अयोग्य पद्धतीने साठवून ठेवलेले आढळले. अस्वच्छ भांड्यांमध्येच अन्नपदार्थ शिजवले जात असल्याचे दिसून आले. याशिवाय अनेक अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने या हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.